पळून लग्न, नऊ महिन्यात अधिकार्‍याच्या २५ वर्षीय मुलीने माहेरी आयुष्य संपवले...

Foto
हैदराबाद : प्रशासकीय सेवेतील एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या २५ वर्षीय मुलीचा मृतदेह रविवारी रात्री तिच्या माहेरी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, मृतदेहाची अवस्था पाहता हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे दिसून येते. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले आयएएस अधिकारी चिन्ना रामुडू यांच्या मयत लेकीने पळून जाऊन लव्ह मॅरेज केले होते.

मंगलगिरीचे पोलीस उपअधीक्षक मुरली कृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी साहितीबाईने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तिच्या पालकांनी माधुरीचा पती राजेश आणि त्याच्या कुटुंबावर हुंड्याची मागणी करुन छळ केल्याचा आरोप केला आहे. तर राजेशने याउलट तक्रार दाखल केली असून, माधुरीच्या पालकांनीच तिला लग्न तोडण्याची जबरदस्तीने करत मानसिक त्रास दिल्याचा दावा केला आहे. परंतु माधुरीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पती राजेशविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी आणि राजेश जवळपास दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मार्चमध्ये त्यांनी पळून जाऊन लग्न केले होते. माधुरीच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, राजेश आणि त्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या कथित छळाबद्दल माधुरीने माहेरच्या लोकांच्या कानावर घातले होते. आईने तक्रारीत असेही म्हटले आहे की, माधुरीला घरी परत आणण्यासाठी त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली होती.
   राजेशने वचन दिले होते की तो माधुरीला सन्मानाने, वडिलधार्‍यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक आपल्या घरी घेऊन जाईल. त्याने आम्हाला माधुरीला त्याच्यासोबत पाठवण्यासाठी पटवून दिले. त्यानंतर लगेचच त्याने अतिरिक्त हुंड्याची मागणी करण्यास सुरुवात केली आणि तिला धमक्या देऊ लागला, असे तिच्या वडिलांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.

राजेश सोमवारी पोलिसांकडे पोहोचला आणि त्याने माधुरीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी करणारी एक याचिका सादर केली. त्याच्या याचिकेनुसार तिचे पालक दोघांच्या लग्नाला मान्यता देत नव्हते. त्यांनी तिला जबरदस्तीने माहेरी आणले होते.

 तिने मला अनेक मेसेज पाठवून आपली व्यथा सांगितली. तिला तिच्या कुटुंबाकडून मानसिक त्रास दिला जात होता. मला सोडून देऊन दुसर्‍या लग्नाला तयार होण्यास दबाव टाकला जात होता. या सततच्या दबावामुळे ती अत्यंत असुरक्षित मनस्थितीत गेली होती असे राजेशने याचिकेत म्हटले आहे. त्याने असेही नमूद केले की, माधुरी गर्भवती होती.

तिच्या पोटात मूल वाढवत आहे याचाही त्यांनी विचार केला नाही. ही आत्महत्या नाही, हा खून आहे. ते प्रकरणाला वळसा घालण्यासाठी आपल्या वजनाचा वापर करत आहेत, असा आरोप त्याने केला आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली. दरम्यान, डीएसपी कृष्णा यांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवाल प्रतीक्षेत आहे.